Photo Credit: Pexels/ Szabo Viktor
YouTube हे Google चे एक व्हिडीओ ॲप्लिकेशन असून YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या किमतींमध्ये कंपनीकडून जवळजवळ 58 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, कौटुंबिक आणि वैयक्तिक अशा सर्वच प्रकारच्या योजनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, त्यासोबतच वाढलेल्या किंमती लागू देखील करण्यात आलेल्या आहेत. YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या किमतींबाबत आवश्यक ती सूचना सध्याच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. ई-मेल मधूनच वाढलेल्या किमतींबद्दल सविस्तर माहिती वापरकर्त्यांना मिळत आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की वापरकर्त्यांना त्यांची सदस्यता चालू ठेवण्यासाठी नवीन किमतींना सहमती देणे आवश्यक आहे.
YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या मासिक विद्यार्थी योजनेमध्ये १२.६ टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून ही किंमत 79 रुपयांवरून 89 रुपये इतकी करण्यात आली आहे. तर सदस्यत्वाच्या वैयक्तिक मासिक योजनेमध्ये १५ टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून त्याची किंमत 129 रुपयांवरून 149 रुपयांवर गेली आहे. त्यासोबत मासिक कौटुंबिक योजना 189 रुपयांवरून 299 रुपयांपर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे 58 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही योजना एका सदस्यत्वावर कुटुंबातील पाच सदस्यांपर्यंत YouTube Premium वापरण्याची परवानगी देते.
वैयक्तिक महिना, त्रैमासिक आणि वार्षिक प्रीपेड प्लॅनच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे, ज्यांची किंमत आता अनुक्रमे 159 रुपये, 459 रुपये आणि 1,490 रुपये अशी आहे. या नवीन किमती नवीन सदस्य आणि विद्यमान प्रीमियम वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत. YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या बदललेल्या किंमतींमध्ये तीन महिन्यांच्या वैयक्तिक योजनेची किंमत यापूर्वी 399 रुपये इतकी असून त्यात बदललेल्या किंमतीमध्ये 15 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून नवीन किंमत ही 459 रुपये इतकी आहे. त्यासोबतच वार्षिक सदस्यत्व योजनेची किंमत ही 1,290 रुपये असून त्यामध्ये सुध्दा 15.05 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून नवीन किंमत 1,490 रुपये इतकी आहे.
YouTube Premium सदस्यत्व हे तुम्हाला वापरकर्ता म्हणून YouTube वरील व्हिडिओज जाहिरात मुक्त स्ट्रीमिंग, 1080p वर उच्च बिटरेट स्ट्रीमिंग, ऑफलाइन डाउनलोड, पार्श्वभूमी प्लेबॅक आणि YouTube Music वर जाहिरात मुक्त स्ट्रीमिंग यासारखे असंख्य फायदे देते. कंपनीकडून वाढविण्यात आलेल्या या किंमती तब्बल पाच वर्षानंतर वाढविण्यात आल्या आहेत.
प्रीपेड प्लॅनच्या किंमती सुध्दा अशाच प्रकारे सुधारित करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, प्रीपेड YouTube Premium सदस्यत्व हे आपोआप रिन्यू करण्यात येत नाही. त्यासाठी नवीन वापरकर्त्यांना स्ट्रीमिंग सेवेमध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी त्याचे सर्व फायदे अनुभवण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक किंवा विद्यार्थी YouTube प्रीमियम योजनेच्या एक महिन्याच्या चाचणीचा पर्याय निवडू शकतात, त्यानंतर त्यांना YouTube Premium साठी सुधारित किंमत भरावी लागू शकते.
जाहिरात
जाहिरात