भारतात सेमीकंडक्टर निर्मितीला वेग; गुजरातमध्ये CG SEMI OSAT प्रकल्प सुरू
गुजरातमधील साणंद येथे CG सेमी आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (OSAT) सुविधेत व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही सुविधा 2026 मध्ये कार्यान्वित होणारा भारतातील तिसरा सेमीकंडक्टर प्रकल्प आहे. देशात सेमीकंडक्टर उत्पादनाचे सक्षम इकोसिस्टम उभारण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाच्या वेगवान प्रगतीचे श्रेय अभियंते, कर्मचारी आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांना दिले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पंतप्रधानांनी सांगितले की, डिझाइन इन इंडिया आणि मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत भारताची सातत्यपूर्ण प्रगती या प्रकल्पातून दिसून येते. डिझाइनपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स व्हॅल्यू चेन मजबूत करणे हा यामागील उद्देश आहे. गेल्या दशकात भारतात झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्रातील ही वाटचाल आहे. यात उत्पादनांपासून सुरुवात होऊन, त्यानंतर घटक (कंपोनंट्स) आणि आता सेमीकंडक्टर उत्पादनापर्यंत भारत पोहोचला आहे.
प्रकल्पाची कालमर्यादा आणि काम पूर्ण होण्याची प्रक्रिया
या प्रकल्पाची सुरुवात मार्च 2024 मध्ये झाली. चिप टेस्टिंग ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झाले. तर व्यावसायिक उत्पादन जुलै 2026 पासून सुरू झाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 27 महिन्यांचा कालावधी लागला.
CG SEMI OSAT सुविधा जपानमधील रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या भागीदारीत विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पात भारतीय, जपानी आणि थाई भागीदारीतून ₹7,600 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 20 कोटी युनिट्स असून, भविष्यात ती वाढवून 500 कोटी युनिट्सपर्यंत नेण्याची योजना आहे. येथे तयार होणाऱ्या चिप्सचा वापर ऑटोमोबाईल प्रणाली, स्कूटर्स आणि औद्योगिक उपकरणांमध्ये केला जाणार आहे. तसेच भारतातून या चिप्सची जपान, अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात करण्याचीही योजना आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावर भर दिला की, सेमीकंडक्टर उत्पादन हे केवळ एका स्वतंत्र युनिटवर नव्हे, तर संपूर्ण इकोसिस्टमच्या विकासावर अवलंबून असते. साणंद आता सिलिकॉन व्हॅली, सिनचू सायन्स पार्क आणि त्सुकुबा सायन्स सिटी यांसारख्या जागतिक केंद्रांच्या धर्तीवर सेमीकंडक्टर क्लस्टर म्हणून उदयास येत आहे. या परिसरात आधीपासूनच मायक्रॉन, केन्स आणि CG सेमी यांसारख्या कंपन्या कार्यरत आहेत. तसेच केमिकल पुरवठादार, टेस्टिंग सुविधा, डिझाइन सेंटर्स आणि सेमीकंडक्टर स्टार्टअप्समुळे हे संपूर्ण इकोसिस्टम आणखी विस्तारण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात