साध्या कागदापासून तयार केलेल्या विमानाने विक्रमी उड्डाण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.
आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या विमानांबद्दल ऐकले असेल, पण आज आपण कागदापासून बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाबद्दल बोलत आहोत. होय, इटलीतील बोलोनिया येथील एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने जगातील सर्वात मोठे कागदी विमान तयार केले आणि ते यशस्वीरीत्या उडवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. या कागदी विमानाचे नाव इकारस (Icarus) आहे. 25 जून रोजी याची उड्डाण चाचणी घेण्यात आली आणि त्याने विमानाच्या हँगरच्या संपूर्ण लांबीइतके यशस्वी उड्डाण केले. चला, या कागदी विमानाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
या कागदी विमानाच्या पंखांचा विस्तार तब्बल 65.75 फूट आहे. तर त्याची लांबी 23 फूटांहून अधिक आहे. हे विमान पूर्णपणे कागद आणि गोंद वापरून तयार करण्यात आले आहे. याने यशस्वी उड्डाण करून जगातील सर्वात मोठ्या कागदी विमानाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. या प्रकल्पाची सुरुवात एका मजेशीर कल्पनेतून झाली होती, पण नंतर तो जागतिक विक्रमात परिवर्तित झाला. या प्रकल्पासाठी तांत्रिक आणि निर्मितीच्या कामात 16 जणांच्या टीमने सहभाग घेतला. MATLAB सिम्युलेशन, दोन प्रोटोटाइप तयार करणे आणि अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. त्यानंतर बोलोनिया येथे आयोजित युरोपियन युनियनच्या 'We Make Future' कार्यक्रमात इकारसचे सादरीकरण करण्यात आले, जिथे या विमानाने यशस्वी उड्डाण केले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला दिलेल्या निवेदनात या गटाने सांगितले की, या प्रकल्पाची सुरुवात लेक्चरच्या मधल्या वेळेत कागदी विमाने उडवण्याच्या एका साध्या कल्पनेतून झाली होती. त्यांनी सांगितले की, योग्य पद्धतीने काम केल्यास कागदाचा एक साधा तुकडाही अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना बनू शकतो. या प्रकल्पासाठी अनेक महिन्यांचा अभ्यास, सिम्युलेशन आणि अनेक चुका झाल्यानंतर पुन्हा सुरुवात करण्यात आली. अंतिम विमान तयार करण्यापूर्वी टीमने ऑनलाइन सिम्युलेशनच्या मदतीने त्याचे पूर्ण आकारातील मॉडेल कसे कार्य करेल, याचा अभ्यास केला. सर्वप्रथम प्रोमेथियस (Prometheus) नावाचे मोठे विमान तयार करण्यात आले. ग्रीक पुराणातील टायटनच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आले होते, ज्याच्या मदतीने विमानाच्या स्ट्रक्चरल डिझाइनची चाचणी घेण्यात आली.
यानंतर डेडालस (Daedalus) नावाचे पूर्णपणे कागद आणि गोंदापासून बनवलेले 26 फूट लांबीचे मॉडेल तयार करण्यात आले. मात्र ते अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाही. तरीही टीमने त्यातून शिकत आपल्या डिझाइनमध्ये सुधारणा केली आणि 13 फूट लांबीचे असे मॉडेल तयार केले, जे हवेत सहज उडू शकत होते. अंतिम विमानाला इकारस (Icarus) असे नाव देण्यात आले, जे डेडालसच्या पौराणिक मुलाच्या नावावरून ठेवण्यात आले. उड्डाणाच्या त्या पौराणिक कथेतून प्रेरणा घेत, टीमने पुढील काही आठवड्यांत 28.5 किलोग्रॅम वजनाचे हे विमान अत्यंत काळजीपूर्वक तयार केले आणि अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना जगासमोर सादर केला.
जाहिरात
जाहिरात