मनुष्याचे पहिले घर हे जरी पृथ्वी असलं तरी सुद्धा कदाचित भविष्यात मानवी वस्तीसाठी चंद्र आणि मंगळ हे दोन सर्वोत्तम उपाय ठरू शकतात. या कारणामुळेच वर्षानुवर्षे विश्व भरातील अनेक स्पेस एजन्सीने अनेक अंतराळयाने चंद्रावर आणि मंगळावर पाठवली आहेत. त्यामधीलच एक Chang'e 5 हे यान 2020 या वर्षी चीनने चंद्रावर पाठवले होते, ज्या मोहिमेमध्ये चीन ने अनेक नमुने पृथ्वीवर संशोधन करण्यासाठी चंद्रावरून आणले होते. यामध्ये चंद्रावरील मातीचा देखील समावेश होता आणि आता एक आनंदाची बातमी चीनने आपल्या संशोधनातून जगासमोर मांडली आहे. ती म्हणजे चंद्रावरील या मातीचा वापर करून चीनने पाण्याची निर्मिती केली आहे. चंद्रावरून पृथ्वीपर्यंत नमुने आणण्याचे काम करणारे 44 वर्षांमधील पहिले यान होते. अवकाश संशोधनाच्या बाबतीत हे शोध आणि निष्कर्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
Chinese Academy Of Sciences या सरकारी संस्थेच्या संशोधकांना असे आढळून आले की चंद्राच्या मातीतील खनिजांमध्ये हायड्रोजनचे प्रमाण अपेक्षपेक्षा जास्त आहे. जेव्हा ही माती अतिशय उच्च तापमानावर गरम केली जाते तेव्हा ह्या मातीतील हायड्रोजन हे त्याच मातीतील इतर घटकांशी विक्रिया करून पाण्याची वाफ तयार करते. तीन वर्षांच्या सखोल संशोधन आणि पडताळणीनंतर शास्त्रज्ञांनी या अभिक्रियेचा वापर करून लक्षणीय प्रमाणात पाणी निर्माण करण्याची पद्धत विकसित केली आहे.
चंद्रावरील नमुन्यांच्या आधारे असा शोध लावणे म्हणजेच ही संशोधकांची एक विलक्षण कामगिरी आहे. जी भविष्यात इतर चंद्रांसंबंधित वैज्ञानिक संशोधन केंद्रे आणि अंतराळ केंद्रांच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण आधार प्रदान करण्याचे काम करते. कोणत्याही ग्रहावरील संशोधनांमध्ये त्यावर पाणी आहे का किंवा पाणी निर्माण केले जाऊ शकते का ही संशोधनाची पहिली पायरी मानली जाते. यामुळे चंद्रावर जाऊन तिथे आपले घर किंवा डोम बनविण्याचे ध्येय पुढे नेले आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनामध्ये असे स्पष्ट झाले आहे की, चंद्रावरील एक टन मातीचा वापर करून 51 ते 76 किलोग्रॅम पाणी बनवता येऊ शकते जे अंदाजे अर्धा लिटरच्या शंभर बाटल्यां इतके आहे.
चीनच्या चंद्रासाठी काही महत्त्वाकांक्षी योजना आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र म्हणजेच ILRS च्या विकासाचा देखील समावेश करण्यात आला आहे, जो रशियाच्या स्पेस एजन्सीच्या सहकार्याने पुढाकार घेत आहे. 2035 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक मूलभूत स्टेशन तयार करण्याचे लक्ष्य चीनच्या अंतराळ संस्थेने आपल्या समोर ठेवले आहे. तर 2045 पर्यंत चंद्राभोवती एक अंतराळ स्थानक प्रदक्षिणा घालणार आहे जसे आपल्या पृथ्वी भोवती एक अंतराळ स्थानक प्रदक्षिणा घालत असते.
या जल उत्पादक पद्धतीचा शोध संशोधकांकडून अतिशय महत्त्वाच्या वेळी लागला आहे, कारण चिनी शास्त्रज्ञ जूनमध्ये पृथ्वीवर परतलेल्या Chang'e 6 मोहिमेतील चंद्राच्या नमुन्यांचे विश्लेषण करतच आहेत. चंद्रावर पाणी निर्माण करण्याची क्षमता केवळ चंद्रावरील मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच नाही तर पुढील अवकाश संशोधनां साठीही आवश्यक ठरणार आहे. नासाने चंद्राच्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले आहे की ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन रॉकेट इंधन तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. ज्याचा मंगळावर जाण्यासाठी आणि त्यापुढील मोहिमांना शक्ती देण्यासाठी फायदेशीर आहे.